वयाच्या सोळाव्या वर्षापासून समाजकारण व राजकारणात सक्रिय सहभाग राहिला विद्यार्थी आणि युवांचे असंख्य प्रश्न मनाला कायमच वेदना देत होते. या विषयात काम केले पाहिजे ही भावना सातत्याने हृदयात होती आणि म्हणून बाहेर राहून केवळ बघत राहण्यापेक्षा प्रत्यक्ष या प्रक्रियेत उतरून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करता येईल का हा विचार मनात आला. यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षापासून सक्रिय समाजकारण व राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेतला.
भारतीय जनता पार्टीची सर्वसामावेशक विचारधारा आणि शेवटच्या व्यक्तीच्या डोळ्यातील अश्रू पुसेपर्यंत कार्य करत राहण्याची पंडित दीनदयाल उपाध्याय यांची अंत्योदयाची शिकवण यावर प्रभावित होऊन भारतीय जनता युवा मोर्चाच्या विद्यार्थी विभागाची मंडल स्थरावरील पहिली जबाबदारी स्वीकारली. यानंतर विद्यार्थी विभाग जिल्हाध्यक्ष, पुढे युवा मोर्चा मंडलाध्यक्ष त्यानंतर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अशा स्थानिक पातळीवरील जबाबदाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. युवांच्या अनेक विषयांमध्ये काम केल्याने काम करण्याचा आत्मविश्वास वाढला व यानंतर 2010 साली थेट भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली, तीन वर्ष फार प्रवास करून व मेहनत घेऊन काम केल्यानंतर 2015 साली सन्माननीय पंकजाताई मुंडे युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या टीममध्ये प्रदेश महासचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
सातत्यपूर्ण प्रवास व संघर्ष करून विद्यार्थी व युवांचे दुःख जाणून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा केलेला प्रयत्न यामुळे 2015 साली सन्माननीय योगेश अण्णा टिळेकर प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या टीम मध्ये पुन्हा महासचिव ही महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली. या जबाबदारीला न्याय देण्याचा मनापासून प्रयत्न केला, हजारो किलोमीटरचा प्रवास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केला, संघटन बांधणी वरती विशेष लक्ष केंद्रित केले, मंडळ स्तरापासून प्रदेश स्तरापर्यंत केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आणि साल 2020 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची अति महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. काळ संघर्षाचा होता राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार नव्हतं अशा काळात सातत्यपूर्ण संघर्ष करत युवांचे विद्यार्थ्यांचे असंख्य प्रश्न हाताळत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रचंड मोठी आंदोलने व संघर्ष केला. अनेक अभियाने कार्यक्रम व प्रवास या माध्यमातून युवांना किंवा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला व संपूर्ण राज्यातील युवा मोर्चाची संघटना सातत्याने क्रियाशील राहील याची काळजी घेतली.
यानंतर सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या टीम मध्ये भाजपा प्रदेश महासचिव म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी माझ्यावर इतक्या कमी वयात पक्षाने फार मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली. यातून भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती ही स्पष्ट होते. घराणेशाही अथवा अन्य कोणत्याही गोष्टीला थारा न देता सामान्य परिवारातील एका व्यक्तीला इतक्या मोठ्या जबाबदारीपर्यंत केवळ भारतीय जनता पार्टी घेऊन जाऊ शकते. सध्या, भारतीय जनता पार्टी प्रदेश महासचिव म्हणून या जबाबदारीला न्याय देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. साल 2000 पासून 2017 पर्यंत सातत्याने संघटनात्मक कामकाजात कार्यरत राहिलो परंतु लोकप्रतिनिधी होणे हे उराशी बाळगलेले स्वप्न कायम होते आणि म्हणून प्रभागातील जनतेची सेवा सुद्धा अविरतपणे सुरूच होती, याचे फलित म्हणून माझ्या प्रभागात झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये समोरून फार मोठ्या धनशक्तीचा वापर होऊनही जनतेने भरभरून आशीर्वाद दिले व 2017 साली पनवेल महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकलो. यानंतर पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी व सन्मान मला प्राप्त झाला या माध्यमातून शहरातील नागरिकांच्या असंख्य अडचणी सोडविण्याचा मनापासून प्रयत्न केला.